फ्लोरिडा विमान अपघात: 'आम्ही दर मिनिटाला 20 हजार फूट वेगाने खाली येतोय,' पायलटसोबतच्या शेवटच्या संभाषणात काय आलं समोर

विमान कोसळल्यानंतर रस्त्यावर एक खोल खड्डा पडला.
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

(महत्त्वाचे: या बातमीत अपघात आणि मृत्यूबाबतचा उल्लेख आहे.)

फ्लोरिडामध्ये खासगी जेट विमानाच्या अपघाताची चौकशी अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाकडून (एनटीएसबी) केली जात आहे. विमान जमिनीवर कोसळून त्याचा स्फोट होण्यापूर्वीच विमानाचे काही भाग तुटले होते का, याची चौकशी नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाकडून केली जाईल.

टेक्सासवरून बहामासला जाणारं लिअरजेट 60 हे विमान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार-ए-लागो या निवासस्थानापासून 14 किलोमीटर अंतरावर कोसळलं. रविवारी (1 नोव्हेंबरला) झालेल्या या अपघातात विमानातील नऊ जणांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये एक उद्योजक, त्याचे कुटुंबीय, वैमानिक आणि 20 वर्षीय सहवैमानिक यांचा समावेश होता.

बर्फवृष्टी तसेच टर्ब्युलन्स हेही अपघातासाठी कारणीभूत ठरले का, याचाही तपास केला जाणार असल्याचं एनटीएसबीने सोमवारी (2 नोव्हेंबर) सांगितलं.

टेक्सासमधील ऑस्टिनहून उड्डाण केल्यानंतर वैमानिकांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (एअर ट्रॅफिक कंट्रोल) विमानाला मध्यम स्वरूपाचे हादरे (टर्ब्युलन्स) जाणवत असल्याची कल्पना दिली होती. त्याचबरोबर बर्फाबद्दलही माहिती सांगितली होती.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

वैमानिकांनी म्हटलं होतं की, "आम्हाला पावसाचे ढग लागले आहेत. आम्हाला 37 हजार फूट उंचीवर जाण्याची परवानगी हवी आहे."

एनटीएसबीचे सदस्य टॉम चॅपमन यांनी सांगितलं की, या संदेशानंतर 30 सेकंदांपेक्षाही कमी वेळात विमान खाली यायला लागलं आणि वैमानिकांनी आपत्कालीन मदतीसाठी संदेश दिला.

त्यानंतर विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. चॅपमन यांनी म्हटलं की, "दुर्दैवाने, विमानातील सर्वांचा मृत्यू झाला."

एनटीएसबीने सांगितले की, बर्फ आणि टर्ब्युलन्स हे घटक या अपघातासाठी कारणीभूत असू शकतात. मात्र, अपघाताचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी सखोल तपास करावा लागेल.

अपघाताच्या वेळी त्या परिसरात वादळी हवामान असल्याचं वृत्त होते.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक अॅडम रॉबिन्सन, त्यांची पत्नी हेलन शार्प आणि त्यांची दोन मुले एमा आणि चार्ली यांचा समावेश आहे.
फोटो कॅप्शन, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक अ‍ॅडम रॉबिन्सन, त्यांची पत्नी हेलन शार्प आणि त्यांची दोन मुले एमा आणि चार्ली यांचा समावेश आहे.
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अपघाताच्या वेळी विमानात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर होता का आणि तो शोधून काढता येईल का, याचाही तपास अधिकारी करत आहेत.

या तपासासाठी एनटीएसबी फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफएए), लेअरजेट कंपनीचे प्रतिनिधी तसंच हवामान शास्त्रज्ञ आणि हवाई वाहतूक नियंत्रण क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत काम करत आहे.

एनटीएसबीचे हवाई सुरक्षा तपास अधिकारी टिमोथी मोनव्हिल यांनी सांगितले की, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामधून विमानाचे अवशेष बाहेर काढणे हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे.

फ्लाईट अ‍ॅनालिसिसनुसार हे विमान अपघातापूर्वी दर सेकंदाला शेकडो फूट वेगाने खाली येत होते.

हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील संभाषणाच्या रेकॉर्डिंगमध्ये विमानातील एका कर्मचारी आपत्कालीन परिस्थिती जाहीर करताना ऐकू येतं.

तो म्हणत आहे, "विमानाचा वेग मर्यादेपेक्षा जास्त झाला आहे आणि आम्ही दर मिनिटाला 20 हजार फूट वेगाने खाली येत आहोत."

त्यानंतर तो म्हणतो, "आम्ही जमिनीवर आदळणार आहोत."

पहिल्या आपत्कालीन संदेशानंतर सुमारे 35 सेकंदांनी कॉकपिटमधून आलेली शेवटची प्रतिक्रिया होती, "आमच्याकडे आता वेळ उरलेला नाही."

या विमानातून जे सात जण प्रवास करत होते, त्यांची ओळख त्यांच्या कुटुंबीयांना एका संयुक्त निवेदनाद्वारे जाहीर केली आहे. या सात जणांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक अ‍ॅडम रॉबिन्सन, त्यांची पत्नी हेलन शार्प आणि त्यांची दोन मुले एमा आणि चार्ली यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे इतर तिघांची नावं रॅचेल रीड, चार्मी फेहर आणि अनिता मारिया सेटिना अशी आहेत.

माध्यमांतील वृत्तांनुसार, पायलटचे नाव जेफ्री ग्रेगरी असं आहे. वयाच्या 17 व्या वर्षी पायलटचा परवाना मिळवणाऱ्या नथालिया फिल्गुइरास या सहवैमानिक होत्या.

विमान रस्त्यावर कोसळले तेव्हा रस्त्यावर असलेल्या एका व्यक्तीच्या पायाला दुखापत झाली.

हा अपघात मिलिटरी ट्रेल या सहा पदरी रस्त्यावर झाल्याची माहिती पाम बीच काउंटी शेरीफ कार्यालयाने दिली. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने आणि रेस्टॉरंट्स आहेत.

अपघातस्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये या निवासी उपनगरातील रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडल्याचं आणि त्यात आग धगधगत असल्याचं दिसत होतं.

विमानाचे अवशेष परिसरातील मैदानं, कार्यालयं आणि घरांमध्ये विखुरल्याचं अधिकाऱ्यांनी सोमवारी (2 नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. जमिनीवर आदळण्यापूर्वीच विमानाचे तुकडे झाले असल्याचा हा संभाव्य पुरावा आहे.

सोशल मीडियावर या अपघाताच्या वेळेचे डॅशकॅम फुटेज व्हायरल झाले आहे. मात्र, त्याची स्वतंत्रपणे पुष्टी करण्यात आली नाहीये.

रविवारी (1 नोव्हेंबर) सकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मार-ए-लागो इथं होते. अपघाताच्या एक तास आधीच त्यांनी जवळच्या विमानतळावरून एअर फोर्स वन या विमानाने उड्डाण केले होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)